अहमदनगर (पारनेर) दि २६ एप्रिल २०२१ : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. इंजेक्शन मिळाले नाही तर आपला रूग्ण दगावेल ही भिती नागरिकांना मनातून दुर करण्याची गरज असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. रेमडेसिविर हा रामबाण उपाय नसल्याचे स्पष्ट करून या इंजेक्शनविनाही अनेक रूग्णांनी कोरोनावर मात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्यातील विविध कोव्हिड सेंटरला रविवारी खा. सुजय विखे यांनी भेटी देत तेथील रूग्ण, डॉक्टर यांच्याशी संवाद साधला. भेटीनंतर पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना विखे यांनी या संकटाला सर्वांनी एकत्रीपणे सामोरे जाण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले, ज्या इंजेक्शनसाठी लोक धावाधाव करीत आहेत ते रेमडेसिविर इंजेक्शन हा रामबाण इलाज नाही.

रूग्णाचे नातेवाईक ज्या तळमळीन त्याची मागणी करतील त्यांची आर्थिक लुटमार होईल. डॉक्टर या नात्याने जबाबदारीने सांगतो की, विळद येथील हॉस्पिटलसह अनेक हॉस्पिटलमध्ये 22 ते 30 वयोगटातील तरूण रेमडेसिविरचे सहा डोस देउनही मृत्यूमुखी पडले आहेत. याउलट एकही इंजेक्शन न देता साठ वर्षे व त्यावरील वयाच्या रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे.

या आजाराचा कोणताही अंदाज बांधता येत नाही किंवा त्यावरील उपचारांची कोणतीही आचारसंहिता ठरलेली नाही. या विषाणूवर कोणते औषध काम करते याचाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे आज रेमडेसिविर उपलब्ध झाले नाही त्यामुळे आपला रूग्ण दगावेल ही भिती मनातून दुर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोनापासून रूग्णांना वाचविण्यासाठी आज फक्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करत आहेत. आरोप प्रत्यारोप करून हा प्रश्न सुटणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी सुजित झावरे, गणेश शेळके, वसंत चेडे, राहुल शिंदे , तहसिलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा उंद्रे, डॉ.अभिलाषा शिंदे आदी उपस्थित होते.