अहमदनगर (पारनेर) : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून मुंबई, पुण्याच्या सह इतर जिल्ह्यांतुन येणारा पाहुण्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या सुचना  महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. तसेच गावात येणार्‍या पाहुण्यांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्याची गरज आहे.

पारनेर तालुक्यात अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या समन्वयातून कडक लॉकडाऊन पाळले जात असल्याचे टाकळी ढोकेश्वर, कान्हुर पठार या गावावरुन दिसुन आले.  त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवित येत असल्याचे सांगतानाच आमदार नीलेश लंके तसेच अधिकार्‍यांच्या कामाचेही मंत्री थोरात यांनी कौतुक केले.

पारनेर शहरातील गणेश मंगल कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली. आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. सुधीर तांबे, जि. प. च्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संभाजी रोहोकले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, ज्ञानदेव वाफारे, योगेश शिंदे, श्रीकांत पठारे, ताराबाई चौधरी, मुख्याधिकारी डॉ. सुनिता कुमावत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

कोरोनाचे संकट मोठे आहे. राजकरणाच्या पलीकडे जाउन संघर्ष करण्याचे आवाहन थोरात यांनी केले. सुरूवातीस एकूण रूग्णसंख्येच्या 60 टक्के राज्यात रूग्ण होते. आज आपण 30 टक्क्यांपर्यंत खाली आलो आहोत. जुन्या पिढीनेही साथीचे रोग पाहिले आहेत. त्याकाळतही लोक विलगीकरणात राहत होते. गावातून वाड्या वस्त्यांवर वास्तव्य करीत होते.

पारनेर शहरासह भाळवणी, टाकळी ढोकेश्वर व जवळा येथील रूग्णांचा आकडा मोठा आहे. तो का मोठा आहे? याची विचारणा थोरात यांनी केली. या गावांती रुग्ण संख्या वाढणार नाही याची काळजी घ्या असे ते म्हणाले. पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग घेउन अधिकार्‍यांनी कोरोना नियंत्रणात ठेवला आहे. कोरोना बाधित रूग्णांना घरामध्ये विलगीकरण करून ठेवले जात नाही ही बाब देखील विशेष असल्याची टिपन्नी थोरात यांनी केली.

ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा पूर्ण क्षमतेने करावा :  आ. निलेश लंके 

कोरोनाच्या दुसरा लाटेत रुग्णांना ऑक्सीजनसह रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. त्यामुळे ऑक्सीजन, रेमडेसिवर इंजेक्शन पुरवठा पुर्ण क्षमतेने करावा अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली आहे. अधिकार्‍यांनी दोन पाउले पुढे जाउन काम केले पाहिजे असेही आ. लंके यांनी यावेळी सांगितले. आम्ही कोरोनावर मात करण्यासाठी कोव्हीड सेंटर सुरू केले आहे. त्यासाठी शासकिय पातळीवर मदत होणे गरजेचे आहे. ऑक्सीजन, रेमडेसिवर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. सकाळी आलेली औषधे दुपारी संपतात. औषधांचा पुरवठा मुबलक करण्याची मागणी आ. लंके यांनी यावेळी केली.