इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत देशात पहिला आलेल्या चारुदत्त साळुंखेचे मत

सातारा, 15 एप्रिल : दिवसातील आपला किती वेळ आपण सोशल मीडियावर घालवतो याचा कित्येकांना अंदाजच नाही. तरुणाई सोशल मीडियावरच पडून असते. फेसबुक आणि व्हाट्सऍपच्या स्टेट्स ठेवण्यासाठी आणि इंस्टाची स्टोरी आणि ट्विटरचे ट्विट्स इत्यादींसाठी लोक अगोदर एक दोन तास विचार करतात आणि ठेवल्यानंतर त्याला किती जणांनी पाहिले, कुणी प्रतिक्रिया दिल्या हे पाहण्यात पुन्हा वेळ जातो. देशातील तरुण, नागरिकांमध्ये प्रचंड उर्जा, क्षमता आहे पण तिचा योग्य ठिकाणी वापर होत नाही असे दिसते. याचा देशाच्या विकासावरही परिणाम होत असतो.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिला आलेल्या साताऱ्याच्या चारुदत्त साळुंखेने त्याच्या यशस्वी कथेत सांगितले आहे.मित्रांनो, आपला जास्तीत जास्त वेळ स्वतःला घडवण्यात घालवा. सकारात्मक विचार ठेवा आणि सोशल मीडियाला बळी न पडता आपल्या परिस्थितीचा विचार करून जिद्द व चिकाटीच्या जोरावर ध्येय साध्य करा, असे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत देशात पहिला आलेल्या चारुदत्त साळुंखेचे मत आहे.

आपला उमेदीतील जास्तीतजास्त वेळ राजकारणात, सोशल मीडियावर न घालवता स्वतःला घडवण्यात घालवा, असे त्यांचे म्हणणे आहे. आजूबाजूला तरुण-तरुणी सोशल मीडियावर किती वेळ घालवतात हे पाहूनच त्याचे असे मत बनले आहे. मोकळा वेळ मिळाल्यानंतर नवीन काही शिकण्या, वाचण्याऐवजी अनेकजण सोशल मीडियावर मौल्यवान वेळ घालवतात, जो एकदा गेला की परत कधीच परत येत नसतो आणि मग पश्चातापाशिवाय दुसरे काही हाती राहत नाही.

पाटण तालुक्‍यातील चाफळ हे चारुदत्तचे मूळ गाव. त्याचे आई-वडील दोघेही कऱ्हाडला शिक्षक आहेत. त्यामुळे त्याचे वास्तव्य कऱ्हाडमध्ये आहे. चारुदत्तचे प्राथमिक शिक्षण कऱ्हाडच्या आदर्श प्राथमिक विद्या मंदिर मधून, पाचवी ते दहावीपर्यंतचे कऱ्हाडच्या शिवाजी हायस्कूलमधून, तर बारावीपर्यंतचे शिक्षण एसजीएम महाविद्यालयातून झाले.

बारावीनंतर त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. पुण्यात शिक्षण घेतानाच कॅम्पस इंटव्यूहमधून त्याला खासगी नोकरीच्या संधी आल्या. मात्र, त्याने त्या नाकारून शासकीय सेवेत जाऊन देशसेवेसाठी काम करण्याची जिद्द ठेवली. त्याने 2017 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगातूनच पहिल्या क्रमांकाने पास होण्याचे ध्येय ठेऊन वाटचाल केली. अखेर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले असून त्याने तरुणांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला चारुदत्त साळुंखेने दिला आहे.