पुणे ११ एप्रिल २०२१ : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना दरोडा व वाहनचोरी पथकाने अटक केले.त्यामध्ये हिंजवडीतील एका नर्ससह तरुणाचा समावेश आहे. पृथ्वीराज संदीप मुळिक (22, रा. दत्तनगर, आंबेगाव ) आणि नीलिमा किसन घोडेकर (रा. भूमकर चौक, हिंजवडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोरोना झालेल्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन कात्रजमधील दत्तनगरमध्ये जादा दराने विक्री होत असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील गणेश ढगे यांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून एक बनावट ग्राहक संबंधिताकडे पाठविण्यात आले.

त्यानुसार पोलिसांनी पृथ्वीराज मुळीकला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मैत्रिण नर्स नीलीमा घोडेकर यांच्याकडून रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी हिंजवडीत नामांकित रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत असलेल्या नीलिमाला अटक केले. याप्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.त्याशिवाय मुद्देमाल जप्त होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जुुबेर मुजावर, नीलेश शिवतरे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, अतुल मेंगे, मॅगी जाधव, गणेश ढगे, सुमीत ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषीकेश कोळप, चेतन होळकर यांच्या पथकाने केली.