कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने सातत्याने प्रथम क्रमांक कायम ठेवला

मुंबई : राज्यात दिवसें दिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने 1 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने सातत्याने प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर दिसत आहे. आज राज्यात कोरोना लसीकरणाने विक्रमी नोंद केली आहे. आतापर्यंत सुमारे 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल राज्य सरकारने यंत्रणेचे कौतुक केले आहे.

फुले जयंतीपासून ते आंबेडकर जयंतीपर्यंत ‘टिकाउत्सव

दरम्यान आज महात्मा फुले जयंतीपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत देशात लसीकरण उत्सव साजरा करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र पंतप्रधान कार्यालयानं ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या पत्रात लसीकरण उत्सव हे कोरोना विरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचं मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे.

लसीकरण उत्सव कोरोनाविरुद्धचं दुसरं युद्ध

नरेंद्र मोदी यांनी लसीकरण उत्सव हे कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या युद्धाची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छतेवर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातील नागरिकांना आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचा एकही डोस वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन केलं आहे. आपल्याला झिरो वॅक्सिन वेस्टेजपर्यंत पोहोचायचं आहे, असं मोदी म्हणाले. ज्यांना लसीची आवश्यकता आहे त्यांना लस दिली जावी, असंही ते म्हणाले.