मुंबई, 09 एप्रिल : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा दहावी आणि बारावीच्या परीक्षा या महिन्यात सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळं कोरोनाच्या संकटामुळं विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा विचार करता ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य आहे का? याची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात आली. त्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी आयटी कंपन्यांशी आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी बोलतांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले कि कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बोर्डाच्या परीक्षेविषयी काही पालकांत व विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे,याची मला पूर्ण कल्पना आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी,पालक,विविध पक्षीय लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी,टीसीएस, गुगल इंडिया आदीसोबत उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे.लवकरच याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला जाईल असे यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले