केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई :  गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी (Corona vaccine) साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे.

सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला 40 लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.मुंबई ही आर्थिक राजधानी आणि व्यापाराचे केंद्र आहे.

औद्योगिकदृष्ट्याही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.