“करोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे,” : भाजप

राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन असणार आहे. सरकारच्या या निर्बंधावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “करोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे,” असं भाजपानं म्हटलं आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली. “राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार असून, केवळ आठवड्याच्या अखेरीस शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल, असं सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यावर सांगितलं होतं. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला असल्याचंही या मंत्र्यांनी आवर्जून सांगितलं होतं. मात्र, मंगळवारी राज्यभरातली गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधानं पाहता ठाकरे सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झालीये आहे,” अशी केशव उपाध्ये यांनी केली.