मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. “उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना भेटून राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. शरद पवारांनी यासाठी होकार दिला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.“सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नाही असं देशमुख म्हणाले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. शेवटी आम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवणे गरजेचं आहे. राजीनामा दिला, विषय संपला,” असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा

नवाब मलिक यांना गृहखात्याचा पदभार कोणाकडे असेल असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्र्यांकडे त्या खात्याची जबाबदारी असते. नंतर मुख्यमंत्री ही जबाबदारी दुसऱ्याकडे देतील. तीन पक्षांचं सरकार असताना चर्चा करुन जो निर्णय होईल तो स्वत: मुख्यमंत्री लोकांना सांगतील” राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

राजीनामा दिल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली

मुंबई उच्च न्यालायाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी ट्विटरवरुन आपलं राजीनामा पत्र पोस्ट करत राजीनामा देत असल्याची घोषणा केलीय. त्यांनी पत्रात काय म्हटलं आहे पाहुया