पुणे, : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच  पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते.

राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिक तसेच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध होत असत. ‘बालगंधर्व’ला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरले होते.गेल्याच आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. ससून रुग्णालयाच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते.  योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वत: डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. सोबतच उपमुख्यमंत्री कार्यालय, आरोग्यमंत्री कार्यालय सातत्याने उपचाराबाबत विचारपूस करत होते. त्यानुसार डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री. राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही श्री. सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

माहिती अधिकारी व्यंगचित्रकार स्वर्गीय राजेंद्र सरग यांना ‘दर्शक’ परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

अहमदनगर : जिल्हा माहिती कार्यालय,अहमदनगरला माहिती अधिकारी असतांना अनेक वेळा राजेंद्र सरग साहेबांशी संपर्क आला होता.पत्रकार आणि वृत्तपत्र क्षेत्रात येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला आणि अहमदनगर जिल्ह्यातिलच काय पण नाशिक,पुणे, बीड आणि परभणी आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील सरग यांना ओळखणाऱ्या सर्वच पत्रकार मित्रांनी त्यांच्या या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली. आमच्या अहमदनगरच्या दर्शकभवनला त्यांनी दिलेली सदीच्छा भेट नेहमी आठवणीत राहील.दर्शक दिवाळी विशेषांकात त्यांचे अनेक व्यंग चित्र प्रसिद्ध झाले. अशा हरहुन्नरी माहिती अधिकारी व्यंगचित्रकार स्वर्गीय राजेंद्र सरग यांना दर्शक परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग  यांचे कोरोनाने निधन झाले. राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो अशा शब्दांत यांना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शासन प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. मनमिळावू म्हणून त्यांचा माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होता.नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्टस् , कामर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये दिवंगत सरग यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांची पदोन्नती होणार होती. त्यामुळे मीडिया जगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यगचित्रकाराला आपण मुकलो आहोत.

राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यंगचित्रकाराला आपण मुकलो : माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे

अलिबाग :- पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग  यांचे करोनाने आज पहाटे निधन झाले. राजेंद्र सरग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो,अशा शब्दात माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन श्री. सरग यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. परंतु दुर्दैवाने शासन-प्रशासन पातळीवर अथक प्रयत्न करूनही जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर करोनाने बळी घेतला.कार्यतत्पर,मनमिळावू, शांत, सुस्वभावी म्हणून त्यांचा प्रशासन, माध्यम व सामाजिक क्षेत्रामध्ये नावलौकिक होता. कला व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच श्री.राजेंद्र सरग यांचा करोना काळातील उत्कृष्ट कामाबद्दल गौरवही करण्यात आला होता.राजेंद्र सरग यांच्या निधनाने एका आदर्श जिल्हा माहिती अधिकाऱ्याला व व्यंगचित्रकाराला आपण मुकलो आहोत. त्यांच्या अशा अकाली जाण्याने माहिती व जनसंपर्क विभागाचे निश्चितच अपरिमित असे नुकसान झाले आहे.सर्वांनीच परिस्थितीचे गांभीर्य समजून स्वतःची, स्वतःच्या कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, जनतेनेही शासन-प्रशासन वारंवार देत असलेल्या सूचनांचे पालन करावे,असे आवाहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.