अहमदनगर : शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खो-खो खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरु व्हावे यासाठी खेलो महाराष्ट्र योजनेचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपले करिअर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी असलेली खेलो इंडिया योजनेप्रमाणे खेलो महाराष्ट्र या योजनेचे प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे पाठवावे. ही योजना मंजूर करुन घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु.

खेलो इंडिया योजनेअंतर्गत देशामध्ये 100 प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यात लोकप्रिय असलेल्या व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असलेल्या खेळाचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. आपल्या कार्यालयाने कबड्डी, ज्युदो, आर्चरी, जलतरण इत्यादी खेळांचे प्रस्ताव तयार केल्याचे समजते. अहमदनगर शहरात व जिल्ह्यात खो-खो या खेळाचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे शेकडो खेळाडू आपल्याकडे आहेत. तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूही आपल्याकडे आहेत. तरी अहमदनगर शहरात खो-खो या खेळाचे प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करून शासनास पाठविण्याची मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्याकडे केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार, प्रा. श्रीकांत निंबाळकर, लक्ष्मीकांत क्षीरसागर, वैभव जगताप, अशोक बाबर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना शेखर पाटील म्हणाले की, एप्रिल महिन्यापासून खो-खो क्रीडा खेळाच्या प्रशिक्षण सुरु करण्याच्या मागणीला मी मान्यता दिली आहे. चांगल्या दर्जाचे मैदान निर्माण करु व एक चांगले प्रशिक्षक नेमून शहरासह जिल्ह्यातील खेळाडू निर्माण करु. याचबरोबर वाडियापार्क येथे इतर खेळांचेही प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.