नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) :कच्च्या तेलाच्या दरात 12 टक्के वाढ झाली आहे. आगामी काळात त्याचे दर प्रतिबॅरल 69 डॉलरवरून 75 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी रविवारी वर्तवली.कच्च्या तेलाला सध्या मागणी वाढली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेनेही गती घेतली आहे त्यामुळे सध्या कच्चे तेल ब्रेंट क्रूडमध्ये सुमारे 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ही वाढ सध्या प्रतिबॅरल 70 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. वाढती मागणी लक्षात घेता आणखी दरवाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.त्यांच्या मते, ही वाढ लक्षात घेता ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 75 डॉलरपर्यंत जाऊ शकते आणि अमेरिकन लाईट क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट प्रतिबॅरल 70 डॉलरपर्यंत जाऊ शकते. ब्रेंट क्रूडच्या मे डिलिव्हरी फ्यूचर्सचा वायदा भाव गेल्या सत्राच्या तुलनेत 4.20 टक्क्यांनी वधारला.हा भाव शुक्रवारी 69.54 डॉलर प्रतिबॅरलवर बंद झाला.

ट्रेडिंगदरम्यान ही किंमत 69.68 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत वाढली.सलग तीन सत्रांत ब्रेंटचे दर 62.38 डॉलर प्रतिबॅरलवरून 7.31 डॉलरवर म्हणजेच 11.71 टक्क्यांनी वाढले. ते 69.68 डॉलर प्रतिबॅरलवर गेले. नजीकच्या काळात त्यात पुन्हा वाढ होणार आहे.त्यामुळे साहजिकच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणार आहेत.70 ते 75 डॉलर किमतीवर ठाम कोरोना काळात तेलाच्या किमतीत जोरदार घसरण झाली होती.त्यामुळे तेल उत्पादक देशांना तोटा भरून काढण्यासाठी किंमत कायम ठेवण्याची इच्छा होती. म्हणून ओपेकच्या बैठकीत पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमुख तेल उत्पादक देश ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 70 ते 75 डॉलर ठेवण्याच्या बाजूने आहेत.

ओपेककडून मर्यादित उत्पादन तेल उत्पादक देशांची संघटना (ओपेक) आणि त्यांची सहकारी कंपनी ओपेक प्लसची बैठक झाली. त्यात ठरल्यानुसार, मर्यादित उत्पादन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.ओपेकचे प्रमुख सौदी अरेबियाने दररोज 10 लाख बॅरल कपात केली आहे, तर रशिया आणि कझाकिस्तानने माफक प्रमाणात वाढ केली आहे. उत्पादन आणि मागणीतील व्यस्त प्रमाणाचा परिणाम साहजिकच दरवाढीवर होणार आहे.