मुंबई: वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैदानिक विकास महामंडळ घोषित करू, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही : देवेंद्र फडणवीस

अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं फडणवीस यांनी सांगितलं.