अहमदनगर : आरोग्य विभागाच्या अंतर्गत ‘क’ गट संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू असताना शहरातील सारडा महाविद्यालयातील केंद्रावर बोगस परिक्षार्थीसह मूळ परीक्षार्थी आणि त्यांना मदत करणारा अशा तीघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात रितेश रमेश गायकवाड (वय 31) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली असून संदीप साहेबसिंग बिघोत (वय 25, रा. जवखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), केसरसिंग स्वरूपचंद सिंगल (वय 21) आणि धरमसिंग प्रेमसिंग सनवन (वय 38, दोघेही रा. गोकुळवाडी, ता. जाफराबाद, जि. जालना) अशी पोलिसांनी पकडलेल्या तीघांची नावे आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट ‘क’ संवर्गाची पद भरती प्रक्रियेसाठी रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यामधील 29 परिक्षा केंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत परिक्षा घेण्यात आली. शहरातील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या केंद्रावर परिक्षा सुरू झाल्यानंतर पर्यवेक्षक नवनाथ भोंदे यांना तीन नंबर ब्लॉकमध्ये एका विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळून आला. त्यानंतर याबाबत केंद्राच्या पर्यवेक्षक अपर्णा क्षीरसागर यांनी फिर्यादी जिल्हा समन्वयक रितेश गायकवाड यांना माहिती दिली. पर्यवेक्षकांनी परिक्षार्थीकडे चौकशी केली असता त्याने त्याचे मूळ नाव संदीप साहेबसिंग बिघोत असल्याचे सांगितले. संदीप बिघोत याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल, सीमकार्ड, चार्जिंग स्लॉट, ईअर पिस हे साहित्य मिळून आले. तसेच त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेच्या 25 पानांचे फोटो आढळून आले. हे फोटो बिघोत परिक्षा केंद्राबाहेर असलेल्या दोघांना पाठवून त्यांच्याकडून उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यातील आरोपी केसरसिंग सिंगल हा मूळ परीक्षार्थी, त्याच्या जागेवर डमी विद्यार्थी म्हणून संदीप बिघोत परिक्षा देत होता, तर धरमसिंग सनवन हा परिक्षा केंद्राच्या बाहेर थांबून मदत करत होता.