पुणे पुणे-शिरूर-अहमदनगर महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून,कोंडी आणि अपघात वारंवार घडत असतात. त्यामुळे या मार्गावर डबल लेनचा उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला लवकरच मंजुरी दिली जाईल. सर्वांत वर सहा पदरी, त्याखाली चार-चार पदरी दोन रस्ते असा 16 पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे.येत्या सहा महिन्यांत या कामाला सुरवात होईल. त्याचवेळी पुणे ते औरंगाबाद ‘डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड’ होणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड झाल्यामुळे अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. त्यासाठी देशातील उत्कृष्ट डिझायनरकडून डिझाइन करून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डिझाइन तयार झाले असून, त्याची पाहणी केली. त्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लवकरच या कामाला मंजुरी देऊन, निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल.

पुणे-मुंबई-कोल्हापूर हा वाहतुकीचा मोठा प्रश्‍न आहे. कारण पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यांतून थेट दक्षिणेकडील हैदराबाद,बंगळुरू, त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी वाहतूक मोठी आहे.त्यामुळे पुणे, मुंबईसारख्या शहरांवर त्याचा परिणाम होतो. त्यासाठी आम्ही मुंबई ते दिल्ली असा 12 लेनचा महामार्ग काम सुरू करत आहे. पहिल्या स्टेपमध्ये 8 लेनचे काम होईल,त्यामुळे मुंबई-दिल्लीपर्यंतचे अंतर 12 ते 13 तासांत वाहनाने पार करता येईल.तर सुरतपासून नवीन महामार्ग काढून नाशिक, अहमदनगर मार्गे सोलापूरकडे जाईल.त्यामुळे पुणे, कोल्हापूर या शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे गडकरी म्हणाले.