अहमदनगर ः येथील टीम टॉपर्स व वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी संगमनेर येथे झालेल्या खुल्या स्केटिंग स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करुन घवघवीत यश संपादन केले. अ‍ॅम्बिशन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर फाउंडेशनच्या वतीने सदर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटात व स्केटिंग प्रकारात ही स्पर्धा पार पडली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध शाळा, स्केटिंग क्लब यांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत आर्यन गुगळे (6 वर्ष वयोगट) याने रौप्य पदक, छबी चौधरी (8 वर्ष वयोगट) हिने दोन सुवर्ण पदक, 10 वर्षे वयोगटात कलश शहा रौप्य पदक, आदर्श बिश्वास दोन कास्य पदक, रुद्र निकम एक सुवर्ण व एक रौप्य पदक तसेच 14 वर्ष वयोगटात भक्ती दगडे एक रौप्य व कास्य पदक, चिंतन दगडे यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून पदकाची कमाई केली.या स्पर्धेत जागृती बागल, रुद्र निकम, कलश शहा, आदर्श बिश्वास यांचा सामना लक्षणीय ठरला. या स्पर्धेत सर्वाधिक पदक पटकाविल्याबद्दल टीम टॉपर संघास चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू गौरव डहाळे, प्रशिक्षक कृष्णा अल्हाट, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवंत खेळाडूंचे टीम टॉपर्सचे उपाध्यक्ष सागर कुकुडवाल, खजिनदार आसिफ शेख, वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लबचे सतीश वाकळे, संदीप वाकळे यांनी खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले. सर्व खेळाडू बुरुडगाव रोड येथील पुंडलिकराव भोसले स्केटिंगरिंग व सावेडी येथील वाकळे पाटील स्पोर्ट्स क्लब मध्ये सराव करतात.