मुंबई : गरजू तरुणांना परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून देभरातील बेरोजगार तरुणांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे याप्रकरणी पुण्यातून चार परदेशी नागरिकांना अटक केली आहे. ३२ वर्षीय ओगुनसकिन ऊर्फ मिशेल ओलायनी , २५ वर्षीय सोटोमिवा थॉम्सन,२६ वर्षीय ओपेयेमी ओडेले ऑगन मोरटी, २२ वर्षीय ओगिस्टीन फ्रांसिस विल्यियम्स अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चेंबूर येथे राहणारे ३० वर्षीय विशाल मांडवकर हे वेबसाईच्या माध्यमातून परदेशात नोकरी शोधत होते. त्या वेळी त्यांना हिल्टन हॉटेल अ‍ॅण्ड सुईट कॅनडा येथे नोकरी असल्याची जाहिरात दिसली. जाहिरातीतील नमूद ई-मेल अ‍ॅड्रेसवर मांडवकर यांनी आपला बायोडाटा पाठवला. त्यानंतर त्यांना हिल्टन हॉटेलमध्ये नोकरी लागल्याचे नियुक्तीचे पत्र यातील आरोपींनी मांडवकर यांना पाठवले आणि मुंबईतील त्यांच्या प्रतिनिधीचा मोबाईल क्रमांक देऊन त्याला भेटण्यास सांगितले.

विशाल मांडवकर यांची 17 लाख 22 हजार 800 रुपयांची फसवणूक

त्यानुसार मांडवकर यांनी त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता व्हिजा फी, पोग्राम फी, एम्प्लॉयमेंट अ‍ॅथोरायजेशन फी, बेसिक ट्रॅन्हलिंग फी अशी वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी मांडवकर यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून नोकरी न लावता त्यांची 17 लाख 22 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणाची तक्रार मुंबईतील वांद्रे कुर्ला सायबर पोलिस ठाण्यात दाखल होताच सायबर पोलिसांनी तपास करून यातील आरोपी हे नायजेरियन असून ते पुणे येथे वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्यावरून तीन नायजेरियन आणि एका पश्चिम आफ्रिकी नागरिकाला अटक केली.