ब्रिस्बेन: ब्रिसबेन कसोटीत विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या विजयामध्ये शुभमन गिल आणि रिषभ पंत यानी केलेली कामगिरी महत्वाची ठरली. भारताच्या विजयाचा पाया शुभमन गिलनं रचला तर विकेट किपर रिषभ पंतनं विजयाचा कळस रचला आहे. शुभमन गिलंन 91 धावा केल्या तर रिषभ पंतनं 89 धावा करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा कायम ठेवला आहे.

भारतासमोर विजयासाठी आस्ट्रेलियानं 328 धावांच आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावांच्या जोरावर पूर्ण केले. शुभमन गिलंने पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात शुभमन गिलंनं 91 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतनं आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह विजयी खेळी केली. चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी यांच्या साथीनं मैदानावर तळ ठोकून उभं राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनं ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 5 विकेटस

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनं 5 विकेटस घेतल्या. मराठमोळ्या शार्दूल ठाकूरनं देखील ऑस्ट्रेलिाच्या 4 विकेट घेतल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने एकूण 369 धावा केल्या. टीम इंडियानं पहिल्या डावात 336 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 294 धावा केल्या होत्या.टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. टीम इंडियाचे 9 शिलेदार ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत जखमी झाले. तरीही भारतानं ऐतिहासिक विजय खेचून आणला आहे.