अहमदनगर (दि १२ जानेवारी २०२१) : लालटाकी येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात आलेले सर्व होर्डिंग्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर हटविण्यात आले. या मागणीसाठी काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात आंदोलन उभे केले होते ३१ डिसेंबरला विद्यार्थी काँग्रेसने या मागणीबाबत मनपा उपायुक्तांना निवेदन दिले होते. त्यावर कारवाई न झाल्यामुळे ७ जानेवारीला  मनपामध्ये झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष काळे यांनी जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला बुलडोजरने होर्डिंग्ज हटविण्याची घोषणा केली होती.

पुतळ्याचे पावित्र्य राखत पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची देखील मागणी काँग्रेसने केली आहे.काँग्रेस पक्षाच्या या आक्रमक घोषणेमुळे शहरात तणाव निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यापूर्वीच जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे मनपाने कारवाई करत सर्व होर्डिंग्ज उतरवले. त्याचबरोबर नेहरू पुतळा परिसराला लागून असणारी अतिक्रमणे देखील हटविली. सोमवार सकाळपासून मनपाच्या साफ सफाई कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छतेसाठी धावाधाव केली होती. 

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला खलीलभाई सय्यद, मनोज गुंदेचा, नलिनीताई गायकवाड, अनंतराव गारदे, फारुखभाई शेख, अनिसभाई चुडीवाला, नाथा अल्हाट, निजामभाई जहागीरदार, चिरंजीव गाढवे, ॲड.अक्षय कुलट, नीता बर्वे, कौसर खान, प्रमोद अबुज, अमित भांड, प्रवीण गीते,  सिद्धेश्वर झेंडे, सुजित जगताप, अज्जूभाई शेख, प्रसाद शिंदे, प्रशांत वाघ, शरीफभाई सय्यद, मुबीनभाई शेख, वाजिदभाई शेख, ॲड.चेतन रोहोकले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा काँग्रेसकडून सत्कार

जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत बैठकीतच शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पंडित नेहरू यांनी भुईकोट किल्ल्यामध्ये वास्तव्यास असताना लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भेट देऊन सत्कार करत जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व मनपा प्रशासनाचे आभार मानले. ट्रस्टने सामंजस्याची भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील काँग्रेसने आभार मानले.

प्रभारी आयुक्त पदाचा चार्ज जिल्हाधिकाऱ्यांकडेच पुढील तीन वर्षांसाठी राहावा – किरण काळे

यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.भोसले यांचे आभार मानताना किरण काळे म्हणाले की, अनेक वर्षानंतर  डॉ.राजेंद्र भोसले यांच्या रूपाने अहमदनगर मनपाला अत्यंत कार्यक्षम आयुक्त लाभले आहेत. त्यांची धडाकेबाज निर्णय घेण्याची पद्धत पाहता अहमदनगर शहराच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडेच प्रभारी आयुक्तपदाचा चार्ज पुढील तीन वर्षांसाठी राहावा अशी भावना व्यक्त केली.