छाया : वाजिद शेख

अहमदनगर (दि ९ जानेवारी २०२०)- येथील शिक्षिका स्वाती अहिरे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल शिक्षण विभागाच्यावतीने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ व मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिक्षक परिषदेचे नेते तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, राजलक्ष्मी कुलकर्णी, छाया शेळके, लिना धसे, मोहिनी कुलकर्णी, नफीसा शेख, समीना खान, अंजु खान, सोनवणे, चंद्रलेखा तिपोळे, सोहेल शेख, बापूसाहेब गायकवाड, राम पोटे, प्रविण उकिर्डे, पालवे आदि उपस्थित होते. शिक्षणाधिकारी रामदास हराळ म्हणाले की, अहिरे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळवून शिक्षण क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचे नांव उंचावले आहे.

जिल्ह्यात अनेक गुणवत्तापुर्ण शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात देखील शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक करुन त्यांनी अहिरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक उपक्रमशील शिक्षक असल्याने गुणवत्तेचा आलेख वाढत असून, याचे श्रेय शिक्षकांना जात असल्याचे स्पष्ट केले. मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी पवार व महेंद्र हिंगे यांनी आपल्या मनोगतामध्ये अहिरे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालय येथील शिक्षिका असलेल्या स्वाती अहिरे यांना एकेएस एज्युकेशन अवॉर्ड 2020 चा ग्लोबल टीचर अवॉर्ड ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे नुकताच प्रदान करण्यात आला. यामध्ये 110 देशातील हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यामधील दिडशे शिक्षकांपैकी अहिरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.अहिरे यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदि विविध क्षेत्रात केलेले कार्य, कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने दिलेले शिक्षणाचे धडे, विविध शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांध्ये विविध कला-कौशल्य गुण विकसित करण्यासाठी शालेय स्तरापासून राज्य स्तरापर्यंत घेण्यात आलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहिरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.