छाया : वाजिद शेख

अहमदनगर – लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने कामगारांच्या पगारवाढीसाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी युनियनचे अध्यक्ष सतीश पवार, लालबावटाचे अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनीता जावळे, राजू ढवळे आदींसह कामगार उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत संपली असताना नवीन करार करून महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली आहे. या प्रकरणी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी पाच ते सहा तारखा होऊन देखील ट्रस्ट कामगारांचे मागण्या सहानुभूतिपूर्वक सोडवीत नसल्याने युनियनच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.

नुकतीच सहायक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या तारखेत ट्रस्टने कामगारांना दरमहा तीन हजार 200 रुपये तीन वर्षांसाठी वाढ देण्यास सहमती दर्शविली आहे. कामगारांना अत्यंत कमी पगार असल्याने ही पगारवाढ परवडणारी नसून, ट्रस्टने कामगारांना चालू वर्षी दरमहा पाच हजार तर पुढील दोन वर्षांसाठी दरमहा सहा हजार रुपये पगारवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.