अहमदनगर : दिनेश भालेराव राष्ट्रीय खेळाडू म्हणून अहमदनगर शहर आणि जिल्ह्याला परिचित आहेत. महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स असोसिएशनच्या राज्य सहसचिवपदी त्यांची निवड झाल्यामुळे अहमदनगर शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केले आहेत. भालेराव यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काळे यांनी भालेराव यांचे कौतुक केले.

यावेळी काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीण भैय्या गीते पाटील, एन. एस. यु. आय. – विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, तायक्वादो प्रशिक्षक व क्रिडा शिक्षक नारायण कराळे, बाॅक्सिग प्रशिक्षक व क्रिडा शिक्षक मच्छिंद्र साळुंखे, तायक्वादो प्रशिक्षक व क्रिडा शिक्षक महादेव मगर, राष्ट्रीय खेळाडु प्रियांका शिरसाठ, युक्ता मिस्त्री, वर्षा आहेरराव, सलमान खान, श्रषिकेश क्षिरसागर, निखिल गंलाडे आदिंसह खेळाडू यावेळी उपस्थित होते.

यावेळी काळे म्हणाले की, दिनेश भालेराव यांनी अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या सचिव पदाच्या माध्यमातून क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्याचे काम आजवर केले आहे. ट्रेक रेसर्स स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून भालेराव यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

भालेराव यांच्या माध्यमातून नगरला राज्याच्या कार्यकारणी मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यामुळे नगरमधील ॲथलेटिक्स खेळाडूंना मोठे पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन यावेळी राष्ट्रीय खेळाडू आणि काँग्रेस क्रीडा विभागाचे प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी उपस्थित प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, खेळाडूंना दिले.