झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्विन या नृत्याविष्कार स्पर्धेत नगरच्या स्नेहा देशमुख यांनी महाअंतिम फेरीत धडक मारली आहे. आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने परीक्षकांची मने जिंकत देशमुख यांनी अंतिम फेरीत पोहचण्याची कामगिरी केली आहे. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रविवारी होणार असून यात डान्सिंग क्विन विजेती ठरणार आहे.या सोहळ्याचे प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर रविवार दि.27 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. स्नेहा देशमुख या नगरमधील लयशाला नृत्य कलानिकेतनच्या विद्यार्थिनी व या कलानिकेतनच्या संचालिका मंजुषा देशमुख यांच्या कन्या आहेत. सुरुवातीपासूनच या स्पर्धेत स्नेहा देशमुख यांनी उत्कृष्ट अदाकारी सादर करून प्रेक्षकांचीहीवाहवा मिळवली. त्यांनी सर्व राउंडमध्ये नेत्रदीपक कामगिरी करीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे रविवारच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशमुख यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाअंतिम फेरीचा संपूर्ण भाग नगरकरांनी आवर्जून पहावा व स्नेहा देशमुख यांच्या नृत्याविष्काराला दाद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.