विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी अजूनही राज्यपाल कोशियारी यांनी निर्णय न घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे जुनी यादी पुन्हा नव्या नावाने द्यावी लागणार कि दिलेल्या जुन्या यादीनुसारच निर्णय होणार कि जुन्या नावामध्ये पुन्हा काही फेरबदल करून नव्या नावांचा समावेश होणार या आणि अशा अनेक चर्चा रंगू लागलया आहेत आणि शेकडो इच्छुक ज्यांना वगळण्यात आले होते त्यांना पुन्हा संधी मिळणार का आता हे सर्व निर्णय राज्यपाल यांच्या कोर्टात आहेत.

राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय राजभवनाकडून 15 दिवसांनंतरही प्रलंबित ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 नोव्हेंबर रोजी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बंद लिफाफ्यात सादर केली होती.15 दिवसांत म्हणजेच 21 नोव्हेंबरपर्यंत ही यादी मंजूर करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याची मुदत शनिवारी रात्री संपली. मात्र, याबाबत राजभवनातून अद्याप कोणतीही हालचाल होत नसल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.

दरम्यान, याबाबत आता पुढे काय करायचे, याचा निर्णय महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून घेतील, असे संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सांगितले. विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा जून महिन्यात रिक्त झाल्या आहेत.मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यपालांकडे नव्या नावांची शिफारस केली नव्हती.

कोरोनाचे कारण सांगितले गेले असले, तरी यामागे राज्यपालविरुद्ध महाविकास आघाडी सरकार या सुप्त वादाची किनार होती. अखेर राज्य सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 12 नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यात आला. तसेच या 12 नावांना 15 दिवसांत मंजुरी द्यावी, अशी विनंती सरकारने केली.मात्र, 15 दिवसांचा कालखंड लोटला, तरी राज्यपालांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.