अहमदनगर (दि २१ नोव्हेंबर २०२०) : आमदार संग्राम जगताप यांची निवड नगरकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केले. शहराचे आमदार संग्राम जगताप यांची विधी मंडळाच्या पंचायत राज समिती व वेतन भत्ते समितीवर निवड झाल्याबद्दल जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने त्यांचा अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपाध्यक्ष दत्ता वामन, सचिव अशोक औशिकर, विलास कराळे, नंदू गायकवाड, राजु टिपरे, राजू काळे,सुनिल खर्पे, रतन गायकवाड, दत्ता खैरे, शंकर गोरे, महंदम शेख आदि उपस्थित होते.याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी महापौर पदापासून आमदारकीच्या काळात नगर शहरातील विविध प्रश्‍न मार्गी लावले आहे. त्यांच बरोबर नगर जिल्ह्यातील राज्यातील विविध विषयांवर विधानसभेत आपल्या कामांनी एक चांगला ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरावरील समितीवर निवड झाली ही नगरकरांसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे.

रिक्षा पंचायतीच्याही विविध अडचणीबाबत आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन त्या सोडविले आहेत. त्यांच्या कामाचा धडाका असाच सुरु राहील, अशी अपेक्षा श्री.घुले यांनी व्यक्त केली. याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, नगर शहरातील विविध प्रश्‍न मार्गी लागत आहे, याचे मोठे समाधान आहे. नागरिकांचे सर्व सुविधा मिळवून नगरचा लौकिक राज्यात निर्माण व्हावा, असे काम सर्वांना बरोबर घेऊन करावयाचे आहे.

आज ज्या समितीवर निवड झाली त्या माध्यमातून राज्याबरोबरच नगर शहरातील प्रश्‍न सोडविण्यासाठी उपयोग करुन घेऊन केलेल्या सत्काराने आपणास आणखी काम करण्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी दत्ता वामन यांनी आ.संग्राम जगताप यांच्या कार्याचा उल्लेख केला. अशोक औशिकर यांनी सर्वांचे आभार मानले.