(छाया : राजू खरपुडे)

अहमदनगर (दि २१ नोव्हेंबर २०२०) – नगर-दौंड या रस्त्यावरील विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अरणगाव ग्रामस्थांसह एमएससीआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, दीपक दांगट, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश पवार,अनिकेत जाधव, शुभम साबळे, आकाश कोराळ, मोहन जाधव, राहुल कांबळे, भरत माळवदे, प्रकाश जाधव, आकाश कोलघळ आदी उपस्थित होते.

MSCRDC अधिकार्‍यांनी येत्या आठ दिवसांत या रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.तत्पूर्वी झालेल्या आंदोलनावेळी नितीन भुतारे म्हणाले, नगर-दौंड रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे,तरीही गेल्या अनेक दिवसांपासून व्हीआरडीई ते विद्यानगर भागातील रस्ता पूर्ण केलेला नाही. हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, तो दुरुस्त करावा, यासाठी निवेदने, खड्ड्यात वृक्षारोपण केले. परंतु आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.

या खराब रस्त्यामुळे आजपर्यंत अनेक छोटेमोठे अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासनास अजून जाग आलेली नाही. आतातरी तातडीने हा रस्ता दुरुस्त करून चारपदरी रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करावी. अन्यथा पुढील काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी नितीन भुतारे यांनी दिला.

याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, या भागातील बराचसा रस्ता चांगला झाला असून, फक्त हा विद्यानगर परिसरातील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाला आहे. त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. या खराब रस्त्यामुळे जाणे येणे मुश्कील झाले असून, अपघात तर नित्याचेच झाले आहेत. तसेच धुळीमुळे या परिसरातील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याची दुरुस्ती व्हावी.