मुंबई (दि २० नोव्हेंबर २०२०) : कराची बेकरी, कराची स्वीट, कराची स्कूल अशी नावे मुंबईत चालणार नाहीत. पंधरा दिवसांत कराची नाव असलेल्या पाट्या बदला, असा इशारा शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी व्यापारी,दुकानदारांना दिला होता. आता या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय वातावरण सुरू असताना शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कराची नाव बदला, ही शिवसेनेची भूमिका नसल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

कराची बेकरी आणि कराची स्वीटस ६० वर्षापासून मुंबईसह देशात आहेत. त्याचा पाकिस्तानशी सबंध नाही.निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

वांद्रे येथे कराची स्वीट बेकरी आहे. या बेकरीचे नाव बदलण्याची मागणी नांदगावकर यांनी गुरुवारी केली होती. कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. देशात अनेक ठिकाणी कराची बेकरी आणि स्वीट्सच्या शाखा आहेत. यातील कराची या शब्दावर नांदगावकरांनी आक्षेप घेत १५ दिवसांच्या आत नाव बदलण्याचा
इशारा दिला होता.स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनीही मुंबईतील कराची बेकरीसमोर आंदोलन केली. यावेळी त्यांनी नाव बदलावे ही मागणी निवेदन देऊन केली. कराची बेकरीमधील पॅकेट्स त्यांनी बाहेर फेकले व निषेध नोंदवला.