पारनेर -अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पारनेर तालुका भरारी पथकाच्या तालुकाध्यक्षपदी भाळवणी येथील सिनेकलाकार रघुनाथ ऊर्फ बाबा आंबेडकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्राद्वारे ही निवड केली. महामंडळाचे जिल्हा समन्वयक शशिकांत नजन यांच्या हस्ते आंबेडकर यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले.

वंचित कलाकारांना न्याय देणार -आंबेडकर

आंबेडकर यांनी अनेक मोठ्या रंगमंचावर नाटके सादर करून अभिनयाचा ठसा उमटवला आहे.अनेक राज्य शासनाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट वास्तुपुरुष, ख्वाडा, कोती अशा अनेक मोठ्या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत .पारनेर तालुक्यात वंचित कलावंतांना न्याय मिळविण्यासाठी शासन दरबारी आपण चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून काम करू असेही आंबेडकर यांनी निवडीनंतर सांगितले.

बोगस ऑडिशन,कलावंतांच्या समस्या, स्वयंघोषित निर्माते व दिग्दर्शक यांच्याकडून कलावंतांची होणारी दिशाभूल आणि शोषण तसेच आर्थिक गैरव्यवहार आणि चित्रपट क्षेत्रातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी व कलावंतांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने भरारी पथक महाराष्ट्रभर कार्यरत आहेत.

आंबेडकर यांच्या या निवडीबद्दल संजय ठुबे, शशिकांत नजान, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे,दीपक कदम,गजेंद्र अहिरे ,मिलिंद शिंदे, रमेश देव,दत्ताभाऊ परभणे,उद्धवराव अमृते, दीपक घारू, श्रीधर अंभोरे, चंद्रकांत पालवे यांनी स्वागत केले आहे.