पटणा (दि १६ नोव्हेंबर २०२०) : काँग्रेसवर आणि राहुल गांधी यांच्यावर आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी घणाघाती हल्ला चढवला आहे. शिवानंद तिवारी म्हणाले की, बिहारमधील निवडणूक शिगेला असताना राहुल गांधी बहीण प्रियांका गांधी यांच्यासमवेत शिमल्यात सहल करत होते. पार्टी अशाप्रकारे चालवतात का? काँग्रेस ज्या पद्धतीने निवडणुका लढवत आहे त्याचा फायदा भाजपलाच होत आहे.आता या ट्विटच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी सुद्धा काँग्रेसवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या.

दुसरीकडे कपिल सिब्बल यांनीही काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे सिब्बल हे काँग्रेसच्या नेत्यांपैकी एक होते ज्यांनी काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते आणि प्रत्येक स्तरावर उच्च नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली होती. सिब्बल यांना नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुका आणि इतर राज्यांतील पोटनिवडणुकीतील खराब कामगिरीबद्दल प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, केवळ बिहारच नाही, जेथे पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्या ठिकाणी या देशातील लोक काँग्रेसला प्रभावी पर्याय मानत नाहीत हा एक निष्कर्ष आहे. तथापि, बिहारमध्ये पर्यायी आरजेडी होती, आम्ही गुजरातमधील सर्व पोटनिवडणुका गमावल्या. लोकसभा निवडणुकीतही आम्हाला तिथे एकही जागा जिंकता आली नाही.

उत्तर प्रदेशच्या बर्याच असेंब्लीमध्ये, काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली, गुजरातमध्ये तीन काँग्रेस उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. त्यामुळे पक्षाच्या स्थिती स्पष्ट झाली आहे. काँग्रेस कार्यकारिणीतील आमचा एक मित्र म्हणतो की मला आशा आहे की काँग्रेस आत्मपरीक्षण करेल.