​​पटणा (दि १६ नोव्हेंबर २०२०) : जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सलग चौथ्यांदा आज शपथ घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडे दोन उपमुख्यमंत्र्यांची पदे असतील.यासह विधानसभा अध्यक्षही भाजपचे असतील. यापूर्वी भाजपाचे तारकिशोर प्रसाद हे बिहारचे नवे उपमुख्यमंत्री असतील आणि सुशील मोदी (सुशील मोदी) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नितीशकुमार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चा नेता निवडल्यानंतर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

बिहारमधील नवीन सरकारची शपथविधी सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता होईल. नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. नितीशकुमार यांनी रविवारी राज्यपाल फागु चौहान यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला. जेडीयूचे नेते नितीशकुमार यांची अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आघाडीच्या रविवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.

एकमताने निवड झाल्यानंतर राज्यपाल फागू चौहान यांची नितीशकुमार यांनी भेट घेतली आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेसाठी दावा केला. त्यानुसार राज्यपालांनी त्यांना निमंत्रण दिले.त्यानुसार सोमवारी (दि.16) दुपारी 3.30 च्या सुमारास राजभवन येथे शपथविधी पार पडणार आहे.नितीशकुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत आहे. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून तर्कवितर्क लढवले जात होते.

मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडे निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, असे जाहीरपणे सांगितले होते. निकालानंतर भाजपच्या दिल्ली मुख्यालयात आयोजित विजयी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांच्याच नेतृत्वाखाली बिहारच्या विकासाला गती देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे संभ्रम संपला होता.