बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी,महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली त्या संबंधित भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीसांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. “परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणं गरजेचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केलंय.“गेल्या 3 ते 4 दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. तो मदतीसाछी आर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून वेदना होतात. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फूटत नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत यापलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामे देखील होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. आज अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे”, अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.“पीक काढणीचं काम सुरु असताना तुफान पाऊस झालाय. शेतकऱ्यांचा लागवड खर्चही आता निघणार नाही. वाहिन्यांवर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे. मदतीसाठी तो आर्जव करीत आहे पण त्याला जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे कसे”, असा शेतकऱ्यापुढे प्रश्न असल्याचं फडणवीस म्हणाले.