राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जे काही झालं तसंच ज्या पद्धतीची वक्तव्यं जिल्हा दंडाधिकारी आणि इतर करत आहेत त्यावरुन उत्तर प्रदेश सरकार काहीतरी लपवत असल्याचं सिद्ध होत आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

“देशात अराजक माजलं असून उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत,” अशी टीका त्यांनी केली आहे. “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं त्याबद्दल योगी आदित्यनाथ सरकारने स्वत:ची चूक कबूल करावी,” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

“उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य राहिलं नसल्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,”असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.“दोन दिवसात उत्तर प्रदेशात बलात्काराच्या तीन घटना समोर आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री काहीही बोलण्यास तयार नाहीत. यासंबंधी सविस्तर चौकशी व्हावी अशी मी पंतप्रधानांना विनंती करते. राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ असाल तर योगी सरकारने राजीनामा दिला पाहिजे”असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.