मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय”. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.