लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. या निकालानंतर आता राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सीबीआय न्यायालयाने दिलेल्या या निकालावर निशाणा साधला आहे. ही तर न्यायाची पूर्णपणे थट्टा असे त्यांनी म्हटले आहे.

“हे पूर्णपणे न्यायाची थट्टा करण्यासारखे आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप असलेल्या सर्वांना निर्दोष सोडण्यात आले. मग काय आपोआप पडली होती? तत्कालीन सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील घटनापीठाने ही घटना कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले होते आणि आता असा निर्णय आला आहे. लाज वाटायला हवी.” अशा शब्दांमध्ये ट्विट करून येचुरींनी या निकालावर टीका केली आहे.

सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस : खासदार ओवेसी

एमआयएमचे प्रमुख खासदार ओवेसी यांनी देखील या निकालावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ”सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? २८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे. जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

Video Courtesy BBC NEWS HINDI