अहमदनगर : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने ज्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत, तेथील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे संभाव्य रुग्णांपर्यंत पोहोचून तात्काळ उपचार देता येत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाची ही लक्ष्य निर्धारित करुन चाचण्यांची पद्धत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. त्याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. खासगी रुग्णालयातून आकारल्या जात असलेल्या शुल्काचे प्री-ऑडिट करण्याची सूचना त्यांनी केली.

विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती तसेच महसूल विषयक बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरोग्य उपसंचालक डॉ. पट्टणशेट्टी, अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदींसह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना बाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. कोणत्या भागातून किती रुग्ण येत आहेत, रुग्ण वाढण्याची कारणे, कोणत्या वयोगटातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हेल्थ सेंटर आदींची माहिती, जिल्ह्यात असणारी व्हेंटिलेटरची उपलब्धता आदींची माहिती घेतली. याशिवाय, खासगी प्रयोगशाळांतून केली जाणारी कोरोना तपासणी, अॅंटीजेन चाचण्या आणि आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण आदींची माहितीही त्यांनी घेतली.खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणार्‍या तक्रारींचा निपटारा कशा प्रकारे होतो, हे त्यांनी जाणून घेतले. जिल्हा प्रशासनाने यासाठी विविध पथकांची नेमणूक केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिली. त्यावर विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सहकार विभागाकडे ऑडिटर मोठ्या प्रमाणात असतात. त्यांची याकामी मदत घेण्यात यावी आणि अशा शुल्कांचे प्री-ऑडिट करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.