अहमदनगर (दि २५ ऑगस्ट २०२०) । अहमदनगर ते कोल्हार आणि कोल्हार ते कोपरगाव या मार्गावर ठिकठिकाणी पडलेले ख़ड्डे तात्काळ बुजविण्याचे निर्देश राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच, या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करु, असे त्यांनी स्पष्ट केले.ना. तनपुरे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी आदींसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. रस्ते व जिल्ह्यातील पूल याविषयी त्यांनी आढावा घेतला.

अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता एन. एन. राजगुरु, एस.डी पवार, कार्यकारी अभियंता नगर विभाग ए. बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता रोहयो (कार्य) विभाग अहमदनगर सानप, उपअभियंता अंकुश पालवे, संजय गायकवाड, श्री. भोसले, श्री. कसबे, श्री. येळाई आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.ना. तनपुरे यांनी अहमदनगर ते कोल्हार व कोल्हार ते कोपरगाव या मार्गाबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. पावसामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे तातडीने भरण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. सध्या खडी टाकून हे खड्डे भरण्यात येत आहेत. उघडीप मिळताच डांबरमिश्रीत खडीने खड्डे भरण्यात येतील, असे यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले.नगर ते कोल्हार डांबरीकरणाचे काम अर्थसंकल्पित झाले असून सध्या निधी उपलब्ध नसल्याने काम हाती घेता येत नाही. अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्यावेळी याबाबत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन सदर काम मार्गी लागेल, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.